‘एसटी’ने त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र पालथा घातला होता. कार्यकर्त्याच्या घरी जाणे, कार्यकर्त्याच्या घरी मुक्कामास राहणे, कार्यकर्त्याच्या वैयक्तिक जीवनातील अडचणी जाणून घेणे, या अडचणींवर उपाय शोधणे अशी चोरडिया यांची कार्यपद्धती होती. त्यावेळी पक्षाचे काम करणारे कार्यकर्ती मंडळी प्रामुख्याने मध्यम वर्गातील असत. प्रत्येकाच्या कुटुंबात काहीनाकाही प्रश्न असत. हे प्रश्न सोडविण्यासाठी चोरडिया हे नेहमीच प्रयत्नशील असत. असंख्य कार्यकर्त्यांना त्यांनी मदत केली मात्र या मदतीची वाच्यता त्यांनी कुठेच केली नाही.
‘भाजप’च्या विचारसरणी विरोधात असलेल्या समाजवादी पक्ष, जनता पक्ष, युवक क्रांती दलाच्या कार्याकर्त्यांशीही त्यांनी सातत्याने संपर्क ठेवला होता. पुण्यात आले की ते ग.प्र. प्रधान, भाई वैद्य या जेष्ठ समाजवादी नेत्यांच्या भेटीला जात आणि विविध मुद्द्यांवर चर्चा करत असत. जेष्ठ संपादक, पत्रकार मंडळी यांच्याशी त्यांचा नित्य संपर्क असे. यामागे त्यांची दूरदृष्टी होती. पक्षाच्या बैठकीत एखाद्या विषयाची मांडणी करतांना कार्यकर्त्यांचे प्रबोधन करण्याबरोबरच मनोबल वाढवण्याकडेही ते लक्ष देत असत. महाराष्ट्रात ‘भाजप’च्या वाढीतील त्यांचे योगदान कधीच विसरता येणार नाही.
- योगेश गोगावले,
माजी उपाध्यक्ष प्रदेश भाजपा
