१९८० मध्ये भारतीय जनता पार्टीची स्थापना झाली. वसंतराव भागवत यांनी पक्षाचे पूर्णवेळ काम करण्यासाठी ज्या तरुणांची फळी तयार केली होती त्यात धरमचंद यांचाही समावेश होता. त्यांच्या कुटुंबाचा धुळयात व्यवसाय होता. एकुलता एक मुलगा असतानाही त्यांच्या आईवडिलांनी भाजपाचे पूर्णवेळ काम करण्यासाठी त्यांना मुभा दिली हे विशेषच म्हणावे लागेल. ८० च्या दशकाच्या प्रारंभी भाजपाचे काम करणे अत्यंत कठीण होते. विशिष्ट जातींचा पक्ष असा शिक्का भाजपावर बसला होता. अशा कठीण कालखंडात आम्ही तरुण कार्यकर्ते वसंतराव भागवतांच्या मार्गदर्शनाखाली काम करत होतो. त्या काळात धरमचंदजींनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. संघटना बांधणीसाठी चांगले कार्यकर्ते तयार करणे आणि ते टिकवून ठेवणे याकडे त्यांचे विशेष लक्ष असे. पत्रकार परिषद कशी घ्यायची, पत्रकार परिषदेत कोणत्या मुद्द्याला प्राधान्य द्यायचे यातले बारकावे त्यांना चांगले ठाऊक होते. पक्षातर्फे प्रसिद्धी पत्रक काढताना कोणत्या बाबींचा उल्लेख केला म्हणजे पक्षाला फायदा होईल अशा बारीकसारीक गोष्टींकडे ते लक्ष देत असत. पक्षाच्या एखाद्या कार्यक्रमाची घोषणा करण्यासाठी, माहिती देण्यासाठी मुंबईत पत्रकार परिषद घेण्याचा पायंडा होता. धरमचंदजींनी मुंबई बरोबरच नागपूर, औरंगाबाद, पुणे, सोलापूर अशा वेगवेगळया मोठ्या शहरांत एकाच दिवशी पत्रकार परिषदा घेण्याची कल्पना प्रत्यक्षात आणली. एकाच वेळी अनेक शहरांत पत्रकार परिषदा झाल्या म्हणजे चांगली प्रसिद्धी मिळेल हा त्यांचा त्यामागचा आडाखा होता.
महाराष्ट्रातील पक्ष कार्यकर्त्यांशी धरमचंदजींचे जिव्हाळ्याचे संबंध होतेच. पण त्याबरोबरच अनेक संपादक / पत्रकारांशीही त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. शेकडो पत्रकारांच्या घरी ते जाऊन आले होते. या मागे वैयक्तिक लाभ हा उद्देश नव्हता तर पक्षाला अनुकूलता कशी निर्माण करता येईल हा विचार होता. धरमजींनी आयुष्याच्या अखेरपर्यंत पक्षाला काय फायदेशीर ठरेल याचाच विचार केला. ‘भाजपा’चे भविष्य कसे उज्ज्वल आहे हे पत्रकार / संपादकांना ते समजावून व पटवून सांगत असत. दिल्लीतल्या मराठी पत्रकारांशीही त्यांचे घनिष्ट संबंध होते. प्रमोद महाजन हे पक्षाचे राष्ट्रीय चिटणीस झाल्यावर दिल्लीत पत्रकारांसाठी धरमजींनी भोजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्या भोजनाचे बिल दिल्लीतील पत्रकारांनी वर्गणी काढून भरले होते.
ज्या पक्षासाठी त्यांनी अविरत कष्ट घेतले तो पक्ष दिल्लीत / महाराष्ट्रात सत्तेत यायची चिन्हे ९० च्या दशकाच्या प्रारंभी दिसू लागली. त्याच काळात राजस्थानात धरमजी एका अपघातात जखमी झाले. त्यांच्या स्मरणशक्तीवर गंभीर आघात झाला. त्यातून हळूहळू सावरू लागल्यावर ते पक्षाच्या कार्यक्रमात सहभागी होऊ लागले. त्या स्थितीतही ते धुळ्यातील पक्षाच्या कार्यालयात दररोज येऊन बसत असत. ‘भाजपा’चा समर्पित संघटक हीच त्यांही एकमेव ओळख होती. धरमजींना माझी विनम्र आदरांजली.
समर्पित संघटक
March 14, 2021
0
धरमचंद चोरडिया नामक भारतीय जनता पार्टीला समर्पित व्यक्तिमत्व ७१ व्या वर्षी इहलोकाचा निरोप घेते झाले. आणीबाणी विरोधातील लढ्यात ते सक्रीय होते. आणीबाणी विरुद्ध सत्याग्रह केल्यामुळे त्यांनाही अटक झाली होती. ते, मी, सुधीर जोगळेकर आणि भिकुजी इदाते येरवडा कारागृहात होते. आम्ही येरवडा कारागृहात १६ महिने एकत्र काढले. या काळात धरमचंद चोरडिया यांच्या स्वभाव वैशिष्ट्यांचा मला जवळून परिचय झाला. आम्ही कारागृहात निर्भय नावाचे हस्तलिखीत साप्ताहिक तयार करत होतो. या साप्ताहिकात उत्तम वाचनीय साहित्य असावे यासाठी धरमचंद सातत्याने प्रयत्नशील असत. कारागृहात असताना ते सर्वांशी संपर्क ठेवून असत. कारागृहात होणाऱ्या चर्चांमध्ये ते हिरीरीने सहभागी होत असत.
- प्रकाश जावडेकर,
केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री
Tags
