ऊर्जामंत्री राऊत यांना मंत्रिमंडळातून हटवा

Manogat
0

भाजपा प्रदेश माध्यम विभाग प्रमुख विश्वास पाठक यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी




ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी जनतेच्या पैशाची उधळपट्टी करत लॉकडाऊन काळात बेकायदा पद्धतीने खासगी कामासाठी विमान प्रवास केल्याचे उघड झाले आहे. मुख्यमंत्र्यांनी राऊत यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी 'भाजपा'चे प्रदेश माध्यम विभाग प्रमुख व ऊर्जा विभागाचे माजी संचालक विश्वास पाठक यांनी केली. सरकारी तिजोरीतून बेकायदा पद्धतीने खर्च केल्याबद्दल भारतीय दंडविधान कलम 406,409 अन्वये राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करावी अशी मागणी करणारा अर्ज आपण वांद्रे येथील निर्मलनगर पोलीस ठाण्यात दाखल केल्याचेही श्री. पाठक यांनी सांगितले.

भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत श्री. पाठक बोलत होते. यावेळी भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये उपस्थित होते.

श्री. पाठक यांनी सांगितले की, लॉकडाऊन काळात ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी 12 जून, 2 जुलै, 6 जुलै रोजी मुंबई - नागपूर, 9 जुलै रोजी औरंगाबाद, मुंबई, नागपूर , दिल्ली असा विमान प्रवास केल्याचे माहिती अधिकारातून मागविलेल्या माहितीत 'महानिर्मिती'ने मान्य केले आहे. हा खर्च ऊर्जा खात्याच्या अखत्यारीतील चारही कंपन्यांनी बेकायदा पद्धतीने केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या अनुमतीशिवाय कोणालाही अशा पद्धतीने खासगी विमानाने सरकारी खर्चाने प्रवास करता येत नाही. वीज बिलांची वसुली करण्यासाठी सामान्य माणसाचा वीज पुरवठा तोडणाऱ्या 'महावितरण'ला आपल्या मंत्र्याच्या खासगी कामासाठी केलेल्या विमान प्रवासाचा खर्च करण्यासाठी मात्र पैसा आहे, हे आश्चर्यजनक आहे.

ऊर्जा मंत्री राऊत यांनी सर्व नियम धाब्यावर बसवीत हा विमान प्रवास केला असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राऊत यांना तातडीने मंत्रिमंडळातून हटवावे अशी मागणी श्री. पाठक यांनी केली. यावेळी श्री. पाठक यांनी ऊर्जामंत्री राऊत यांच्या विमान प्रवासाच्या खर्चाचा तपशील देणारी कागदपत्रे व राऊत यांच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीची प्रत सादर केली.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Accept !