सरकार आणि सत्ताधारी पक्षांविरोधात मतप्रदर्शन
करणाऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सध्या महाराष्ट्रात सुरु आहे. या घटना
आणीबाणीचे स्मरण करून देणाऱ्या आहेत. या घटनांचा आपण तीव्र निषेध करतो, अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पार्टीचे
राष्ट्रीय सचिव विनोद तावडे यांनी आज व्यक्त केली.
रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अटकेबाबत पत्रकारांशी बोलताना
श्री. तावडे यांनी सांगितले की, ज्या आत्महत्या प्रकरणाचा
तपास पोलिसांनी बंद केला होता, त्याचा तपास पालघर येथे
साधूंच्या हत्येवरून सरकारवर टीका
केल्यामुळे पुन्हा सुरु केला गेला. पालघर येथे झालेल्या साधूंच्या हत्येबाबत आघाडी
सरकारला जाब विचारल्यानेच अर्णब गोस्वामी यांना अटक करण्यात आली. गोस्वामी हे दोषी
असतील तर त्यांच्यावर जरूर कारवाई व्हायला हवी. मात्र पहाटे पाचला जाऊन त्यांना
अटक केली गेली. यावरूनच हे सरकार सूडबुद्धीने काम करीत असल्याचे सिद्ध होत आहे.
सत्ताधारी शिवसेना पक्षाच्या नेत्यांबद्दल समाज माध्यमातून मतप्रदर्शन करणाऱ्या निवृत्त नौदल अधिकाऱ्याला घरी जाऊन बेदम मारहाण करण्यात आली. एका मंत्र्याबद्दल टिप्पणी केली म्हणून मंत्र्याच्या बंगल्यात नेऊन तरुणाला मारहाण केली गेली, या सर्व घटना आणीबाणीत झालेल्या अत्याचाराचे, दडपशाहीचे स्मरण करून देणाऱ्या आहेत, असेही श्री. तावडे यांनी नमूद केले.
