ठाकरे सरकार आणीबाणीचे व्यवस्थापक : आशीष शेलार

Manogat
0



राज्य सरकारने रिपब्लिक टिव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्यावर सूडबुद्धीने केलेल्या कारवाईचा भारतीय जनता पार्टी तीव्र निषेध करत असून 1975 च्या आणीबाणीची केवळ समर्थक असलेली शिवसेना आज गांधी परिवाराच्या दबावाखाली येऊन आणीबाणीची व्यवस्थापक बनली आहे अशी टीका भाजपा नेते आ. आशीष शेलार यांनी बुधवारी केली.

 

भाजपा मुंबई कार्यालयात आयोजीत केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. यावेळी भाजपा मुख्य प्रवक्ता केशव उपाध्ये उपस्थित होते.

 

श्री. शेलार म्हणाले की, नियतीचं कालचक्र कसं असते ते आजच्या अर्णब गोस्वामी यांच्या अटकेच्या घटनेवरून स्पष्ट झालं आहे. 1974 साली इंदिरा गांधी यांच्या काँग्रेसने देशात आणीबाणी जाहीर केली तेव्हा शिवसेनेने त्यांचे समर्थन केले होते. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या शिवसेनेने सोनिया गांधी आणि राहूल गांधी यांच्या दबावाखाली येऊन सूडबुद्धीने कारवाई करत आणीबाणीचे जणू व्यवस्थापनच केल्याचे चित्र आहे. संविधानरक्षण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्या संदर्भात वेळोवेळी आवाज उठवणारे सर्वजण आज मात्र गप्प बसले आहेत.

 

श्री. शेलार म्हणाले की, मविआ सरकारने ही कारवाई केवळ गांधी परिवाराच्या आदेशानुसार केली आहे. या घटनेनंतर तीन संकेत मिळतात ते म्हणजे गांधी परिवाराला आणि ठाकरे परिवाराला कोणी प्रश्न विचारायचे नाहीत कारण ही राजघराणी आहेत. त्यांना अडचणीत आणणारे प्रश्न विचारले तर कारवाई केली जाईल, ठाकरे परिवाराच्या हिंदूत्वाला अडचणीत आणणारे प्रश्न माध्यमांनी विचारू नयेत, हिंदूत्वाविषयी आणि देशहिता संदर्भात जे-जे पत्रकार प्रश्न विचारतील त्या सर्व पत्रकारांवर अशीच कारवाई केली जाईल यांचे संकेत या घटनेतून मिळतात. मविआ सरकारच्या कालखंडात आत्तापर्यंत 57 पत्रकारांवर केसेस दाखल केले आहेत. तसेच सरकारविरोधात जे कोणी सामान्य व्यक्ती बोलत आहेत त्यांच्यावरही कारवाई केली जात आहे.

 

श्री. शेलार म्हणाले की, नाईक परिवाराला न्याय मिळालाच पाहिजे ही भाजपा भूमिका स्पष्ट आहे. मात्र, नाईक परिवाराची केस दाखवून स्वत:चा सूड घ्यायचा राज्य सरकारच्या या भूमिकेचा आम्ही निषेध करतो. अशा बंद केसेस पुन्हा ओपन करण्यास लागलो तर ठाण्यातील परमार बिल्डरची केसही ओपन करावी लागेल. त्या घटनेतल्या सूसाईड नोटमध्ये ज्यांचे नाव आहे त्यानुसार राज्य सरकारला पळता भूई थोडी  होईल.

 

या घटनेवर सोनिया गांधी आणि राहूल गांधी यांनी प्रतिक्रिया द्यावी असेही श्री. शेलार म्हणाले.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Accept !