
भारताचे राजकारण हे गेली अनेक वर्षे मोठ्या
प्रमाणावर घराणी आणि व्यक्ती केंद्रित होते हे मान्य करावेच लागेल. आजही देशातील
सर्वात जुन्या काँग्रेस या राजकीय पक्षाला गांधी घराण्या बाहेरचा अध्यक्ष नेमण्याची
कल्पना सहज पचवता येत नाही हे दिसून येते आहे. पण त्यातले बारकावे तपासले तर काँग्रेस
मधील नवीन पिढी गांधी घराण्या बाहेरचा अध्यक्ष नेमण्याचा आग्रह धरण्यात पुढे आहे. याच
प्रकारची कमी जास्त स्थिती देशातील सर्व कौटुंबिक मालकीच्या राजकीय पक्षांमध्ये
दिसून येते आहे. याचाच अर्थ भारतातील तरुण पिढी या घराणेशाहीच्या मानसिकतेतून
बाहेर पडू ईच्छित आहे. २०१४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत सत्ता बदलाच्या बाजूने तरुण
पिढीने मोठ्ठे योगदान दिलेले आहे. हि सर्व आकडेवारी सर्वत्र उपलब्ध आहे.
त्या निवडणुकीत प्रस्थापितांना पराभव स्वीकारायला
लागेल असा थोडाफार अंदाज सर्वांना होता. भाजपा जेमतेम आकडा गाठेल असेही वाटत होते
आणि त्यासाठी विरोधकांची गोळा बेरीज करण्याचा प्रयत्न देखील सुरु होता. पण
प्रत्यक्षात निवडणुकीनंतर देशातल्या सर्वात जुन्या पक्षापुढे आणि त्या
पक्षाचे मांडलिकत्व पत्करून आपापले वेगळे सुभे चालवणाऱ्या प्रादेशिक पक्षांपुढे
स्वत:च्या अस्तित्वाची समस्या उभी राहिली अशी दारुण अवस्था त्या सगळ्या पक्षांची
झाली. २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीत पुन्हा मोदी वाढीव बहुमताने निवडून आले आणि
विरोधी पक्षांच्या परिस्थितीत देखील फारसा बदल पडला नाही. सर्व साधारणत: माणूस असो
किंवा व्यक्ती समूह आपला पराभव पचवणे सगळ्यांनाच जड जाते आणि स्वत:चे वस्तुनिष्ठ
आत्मपरीक्षण करण्याची मानसिकता फार कमी लोकांमध्ये असते. परिणाम स्वरूप आपल्या
पराभवाचा दोष दुसऱ्याच्या माथी फोडण्याचा प्रकार जास्त असतो. २०१४ पासून श्री.
नरेंद्र मोदी हा आपल्या अस्तित्वाला असलेला मोठ्ठा धोका आहे असा ठाम समज देशातल्या
बहुतांश राजकीय पक्षांच्या मालकांमध्ये झालेला स्पष्ट दिसतो. मोदींचे फोटो
लावून मते मिळवलेल्या शिवसेनेसारख्या पक्षासहित कोणीही त्याला अपवाद नाही.
त्यामुळेच भारताच्या राजकारणात आपल्याला टिकायचे असेल आणि आपल्या पुढच्या पिढीला
राजकारणाच्या धंद्याला लावायचे असेल तर श्री. मोदींना काही करून घालवा असा एकमुखी
निर्णय बहुतेक बिगर भाजपा राजकीय पक्षांनी घेतलेला दिसतो आहे.
या बिनडोकपणाच्या निर्णयामुळे मोदी विरोधासाठी
देश विरोधी कृत्य किंवा भूमिका घ्यायला देखील हि राजकीय मंडळी मागे पुढे पहात
नाहीत असे दिसते आहे. मोदी विरोधासाठी आधीच्या पाच वर्षात वैयक्तिक खोटे आरोप, वैयक्तिक हीन टीका, प्रत्येक देशहिताच्या
निर्णयावर शंका घेणे, चारित्र्य हनन करणे हे सर्व करून
पाहिले होते. पण श्री. मोदींवर किंवा त्यांच्या पक्षावर याचा काहीही परिणाम झाला
नाही. आता मोदी-२ च्या काळात संधी पाहून वेगवेगळ्या समाजांमध्ये असंतोष भडकावणे, सिएए किंवा एनआरसी सारख्या विषयात त्यांच्या गैरसमजाना खत पाणी घालणे आणि
सर्वात नीचपणा म्हणजे विदेशी पाहुणे दिल्लीला भेट देण्यासाठी आलेले असताना
प्रत्यक्ष जातीय दंगे घडवण्यासाठी मदत करणे असे प्रकार हे सर्व पक्ष करीत आहेत.
एका अर्थाने मानवी हक्कांच्या गोंडस नावाखाली अंतर्गत यादवी निर्माण करण्याचा हा
उघड उघड प्रयत्न आहे. आणि त्याचे उद्दिष्ट केवळ श्री. मोदींना हतबल करणे, घालवणे हाच आहे.
आपल्या संपूर्ण आयुष्याचे बलिदान देशसेवेला
दिलेल्या माणसावर एका सुसंस्कृत देशात हि अवस्था यावी हे खरे तर त्या देशाचे
दुर्दैवच आहे. पण आपल्या देशाचा रामायण कालापासुनचा ईतिहास असाच आहे. त्यामुळे
यातून मार्ग काय हा प्रश्न महत्वाचा आहे आणि श्री. नरेंद्र मोदी दिनांक १७
सप्टेंबरला वयाची ७० वर्षे पूर्ण करीत आहेत त्यानिमिताने हा प्रश्न मी मांडला आहे.
मुळात श्री. नरेंद्र मोदी हि व्यक्ती सहजपणे
समजणे तसे अवघडच आहे. त्याचं ईतर राजकारण्यां पासूनचे वेगळेपण, त्यांची एकाग्रता, त्यांचा आत्मविश्वास, त्यांची उर्जा, त्यांची परिश्रम घेण्याची
क्षमता, त्यांची जगावेगळी विचारक्षमता या सर्व गोष्टी
वेगळ्याच आहेत. त्यांना देवरूप देऊन मोकळे होणे हे भक्तांसाठी सोपे असेलही पण हा
त्यांच्या व्यक्तिमत्वावर वर केलेला अन्याय ठरेल. एका छोट्या गावात जन्मलेला मुलगा
लहानपणापासून राष्ट्रसेवेचे स्वप्न पहातो आणि आयुष्यभर अनेक अडचणीवर मात करून
राष्ट्रसेवेची सर्वोच्च संधी मिळवतो आणि गेली ६ वर्षे ती आपल्या कल्पकतेने
उत्कृष्ठरीत्या वापरतो हा सविस्तर अभ्यासाचा आणि संशोधनाचा विषय आहे.
त्यांच्या जीवनप्रवासातून पुढील पिढ्यांसाठी नक्कीच अनेक गोष्टी शिकण्यासारख्या
आहेत आणि त्या जरूर पुढे आणल्या पाहिजेत असे मला वाटते.
आता मुख्य मुद्दा जो आपल्या सर्वांच्या मनात आहे
त्याचा विचार करूयात. या नकारात्मक परीस्थितीत
श्री. मोदी या सर्व विरोधकांवर मात करून भारताला त्यांनी ठरवलेल्या प्रगतीच्या
उद्दिष्टांपर्यंत पोहोचवू शकतील का? आणी कशावरून ते या
विरोधी पक्षांनी उठवलेल्या वादळामध्ये टिकतील किंवा त्याना पुरून उरतील?. या प्रश्नाच्या उत्तरासाठी आपण सर्वांनी श्री. मोदींच्या मानसिकतेला
समजावून घेतले पाहिजे. आपण सर्वजण अशाप्रकारचे मोदींच्या भोवती घोंगावणारे
चक्रीवादळ पहिल्यांदा पहात असलो तरी श्री. मोदींना अशी वादळे नवीन नाहीत. भाजपा
प्रचारक असताना एका वेळी त्याना गुजरात भाजपाची गरज म्हणून संघातून मागून घेण्यात
आले. आणि त्यांच्या हातभारामुळे गुजरातमध्ये भाजपा १५% मतांच्या वरून २६%वर
पोहोचून सत्तेचा भागीदार झाला, त्यानंतर त्याना गुजरात
भाजपाची जबाबदारी देऊ नये म्हणून सर्व भाजपानेते एकत्र आले आणि केंद्रीय
नेतृत्वाने त्यांच्या समोर शरणागती पत्करून मोदींना राज्याबाहेर जबाबदारी दिली.
गोधरा हत्याकांडानंतर त्यांच्या विरुध्द राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर
प्रचंड मोठे अभियान चालवण्यात आले आणि विरोधी पक्षांनी आकाश पाताळ एक केले. या व
अशा अनेक वादळातून श्री. मोदी सुखरूप बाहेर पडले ते केवळ त्यांच्या आत्मबोधी
मानसिकतेमुळे. मानसशास्त्रात अमेरिकन मानसशास्त्रज्ञ अब्राहम मेस्लो यांचा गरजांची
उतरंड (Hierarchy of Needs) हा सिद्धांत मला वाचायला
मिळाला. या उतरंडीतील ( मुळ शब्द पिरामिड ) सर्व मानवामध्ये अतृप्त असणा-या
खालच्या स्तरातील प्राथमिक गरजा भागल्यावर मानव वरच्या स्तरातील गरजाकडे वळतो आणि
त्या गरजा पूर्ण झाल्यावर सर्वात शेवटी त्याचे आत्म-वास्तविकीकरण ( Self
Actualization ) होते असे या सिद्धांतामध्ये सांगितले आहे. याच प्रकारचे वर्णन आपल्याकडे संत ज्ञानेश्वरांनी स्थितप्रज्ञ या अवस्थेचे
केले आहे. माझ्या मते मोदींना आत्मबोधित असे म्हणावे लागेल. श्री. मोदींच्या
मानसिकतेचा विचार केला तर सामान्य मानवातील काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर या प्राथमिक गरजा किंवा भावनांपासून ते गेली अनेक वर्षे लांब
आहेत. त्यांच्या मनात आता फक्त स्वीकारलेल्या
जबाबदारीचा विचार उरलाय.ते आपल्या विश्वात जगतात
आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाचा पाया प्रखर राष्ट्रप्रेम, नैतिकता आणि विवेक ह्यांच्या मुशीत घातला गेला असल्याने या
मर्यांदांचे भान कायम ठेवून ते फक्त एकाग्रतेने आपले
कर्तव्य करतात हि वस्तुस्थिती आहे. आपल्यासारख्या सामान्याना किंवा मोदी विरोधकांना देखील हि गोष्ट अशक्य वाटेल पण हि वस्तुस्थिती आहे. खर तर मोदी
विरोधकांची हि मोठी समस्या देखील आहे कि नीच पातळीवर जाऊन केलेल्या टीकेने सुद्धा
ते मोदींचे मन:स्वास्थ्य बिघडवू शकत नाहीत किंवा त्यांना निराश, हतबल बनवू शकत नाहीत.
श्री मोदींना एका व्हिडीओ काॅन्फरन्स मध्ये एका
ईंजीनीअरने प्रश्न विचारला “इतिहासाच्या पुस्तकात तुमच्या कामाची नोंद कशी व्हावी
असे तुम्हाला वाटते?” त्याला मोदींनी दिलेले
अनपेक्षित उत्तर बोलके आहे. “इतिहासात माझ्या नावाची नोंद व्हावी असे मला अजिबात
वाटत नाही पण या देशाची काय प्रगती झाली याची नोंद जरूर
व्हावी” म्हणजे श्री. मोदींना कोणत्याही श्रेयाची अपेक्षा नाही. आपल्या नावाने
शाळा, कॉलेजे, रस्ते, पुतळे होण्यापेक्षा देश प्रगतीपथावर जावा हीच त्यांची इच्छा आहे. आपला
वाढदिवस साजरा करणे त्यांना आवडत नाही. त्या ऐवजी सेवा सप्ताह करावा अशी त्यांची इच्छा
आहे आणि त्यामुळेच सध्या देशभरात सेवा साप्ताह सुरु आहे. अशा या संपूर्ण समर्पित
आत्मबोधी व्यक्तिमत्वाला दीर्घायुष्य आणि बराच कार्यकाल लाभो हि मनापासून
शुभेच्छा.
- प्रा. विनायक आंबेकर, पुणे