राज्यभरातील दहा हजार प्रतिनिधींच्या उपस्थितीत भाजपाची रविवारी राज्य परिषद

Manogat
0


भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अधिवेशन रविवार दि. 16 फेब्रुवारी रोजी स्व.राम कापसे नगर, नवी मुंबई येथे होणार असून महाराष्ट्रातील पुढच्या राजकीय वाटचालीची दिशा कार्यकर्ते व जनतेला देण्यात येईल. विधानसभा निवडणुकीत जनादेश मिळूनसुध्दा शिवसेनेने जनादेशाचा अपमान करुन काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची साथ पकडल्यामुळे जे नवीन राजकीय समीकरण महाराष्ट्रात निर्माण झाले त्या बाबतची स्पष्ट दिशा आणि आगामी कामाची योजना या अधिवेशनात  ठरविण्यात येईल.

राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीत आजच नियुक्त झालेले प्रदेश अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील अध्यक्ष पदाची सूत्रे या अधिवेशनात स्वीकारतील, अशी माहिती भाजपा नेते विनोद तावडे यांनी गुरुवारी मुंबईत दिली. भाजपा नेते विनोद तावडे म्हणाले की, या अधिवेशनात राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. भाजपा राष्ट्रीय सहसंघटनमंत्री व्ही. सतीशजी, केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर, रेल्वेमंत्री पीयूष गोयल, केंद्रीय राज्यमंत्री व माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब पाटील दानवे, माजी अर्थमंत्री व माजी प्रदेशाध्यक्ष सुधीरभाऊ मुनगंटीवार, माजी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे, प्रदेश संघटनमंत्री विजयराव पुराणिक यांच्यासह पक्षाचे विविध नेते उपस्थित राहणार आहेत.

या दोन दिवस चालणाऱ्या राज्यस्तरीय अधिवेशनात पहिल्या दिवशी विधानसभेत विस्तारक म्हणून गेली दोन वर्षे काम करत होते त्यांची बैठक घेउन विधानसभा निवडणुकीतील समीकरणे, वास्तव चित्र यांचे विश्लेषण, त्याद्वारे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे नियोजन याचा विचार होईल. तसेच दुपारी 2.00 वाजल्यापासून राज्यातीलल भाजपा खासदार, आमदार, जिल्हा अध्यक्ष, महापौर, जि.प. अध्यक्ष, प्रदेश पदाधिकारी यांची बैठक होउन त्यात सद्य राजकीय स्थिती यावर चर्चा होउन पक्षाची आगामी दिशा व आगामी धोरण ठरविले जाईल.

दि.16 फेब्रुवारी रोजी सकाळी 11.30 वाजता राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डाजी यांच्या हस्ते ध्वजारोहण होउन राज्य परिषद अधिवेशनाला सुरुवात होईल. या अधिवेशनाला महाराष्ट्रातील भाजपाचे सर्व लोकप्रतिनिधी, नगरपालिका पासून ते खासदारांपर्यंत, मंडल अध्यक्षांपासून जिल्हा अध्यक्ष, सरचिटणीस, आघाडयांचे संयोजक असे सुमारे 10 हजार प्रतिनिधी उपस्थित राहतील. या प्रतिनिधींना राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डाजी हे मार्गदर्शन करतील. त्याच उद्घाटन सत्रात प्रदेश अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतील.

राज्य अधिवेशनामध्ये दोन प्रस्ताव पारित होतील. त्यामध्ये जनादेशाचा अपमान करुन शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस सरकारने संधीसाधु महाविकास आघाडी सरकार बनविले, त्यांच्या 80 दिवसांच्या कारभाराचा पंचनामा प्रस्तावाद्वारे करण्यात येईल. तसेच सत्तेवर आल्यावर जनतेची फसवणूक कशी चालू आहे याची झाडाझडतीही प्रस्तावाद्वारे होईल.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने जनहिताचे अनेक निर्णय व जनहिताच्या योजना राबविल्या, राममंदिरच्या निर्माणासाठी ट्रस्टची स्थापना याबरोबरच नागरिकता संशोधन कायदा (CAA) करुन महत्वाचे ऐतिहासिक कार्य केले, त्याबदृदल पाठिंबा दर्शविणारा ठराव मांडण्यात येईल.

विधानसभा निवडणुकीत बदललेल्या राजकीय समीकरणात येणाऱया स्थानिक स्वराज्य संस्थांच निवडणुकांच्या तयारीच्या बाबतीतही या प्रसंगी चर्चा केली जाईल.

राज्यस्तरीय अधिवेशनाचा समारोप माजी मुख्यमंत्री तसेच विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस करतील.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Accept !