भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांची मागणी
अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना
दिलेला शब्द पाळून हेक्टरी २५ हजार रुपये नुकसान भरपाई देण्याची मागणी भारतीय जनता
पक्षाचे प्रदेशाध्यक्ष श्री. चंद्रकांत दादा पाटील यांनी केली. शेतकऱ्यांना नुकसान
भरपाई मिळावी यासाठी विधान भवनाच्या पायऱ्यांवर आज भारतीय जनता पक्षाच्या सर्व
आमदारांनी आंदोलन केले. यावेळी श्री. चंद्रकांत दादा पाटील यांनी ही मागणी केली.
श्री. पाटील म्हणाले की,
"अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी २५
हजार रुपये नुकसान भरपाई देण्याची मागणी स्वत: मा. मुख्यमंत्री श्री. उद्धवजी
ठाकरे तुम्हीच केली होती. यासाठी तुम्ही शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन झालेल्या
नुकसानीची पाहणी केली होती. यावेळी आपलं दु:ख तुमच्यासमोर मांडताना एका शेतकऱ्याला
अश्रू अनावर झाल्याचे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं होतं. त्यावेळी तुम्ही त्या
शेतकऱ्याला आश्वस्त केलं होतं. आता याचीच आठवण आम्ही तुम्हाला करुन देत
आहोत."
ते पुढे म्हणाले की,
"सत्तेसाठी तुम्ही जनादेशाचा अपमान करुन सरकार स्थापन केलं.
आता अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचा विश्वासघात करु नका.
शेतकऱ्यांना योग्य तो न्याय द्या. त्यांना तुम्ही जे आश्वासन दिलं होतं, ते पूर्ण करा!"
विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्रजी
फडणवीस,
विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीणजी दरेकर, पक्षाचे प्रतोद अॅड. आशिष शेलार यांच्यासह रयत क्रांतीचे सदाभाऊ खोत यांनी
आंदोलनात सहभाग घेऊन सरकार विरोधात तीव्र घोषणाबाजी केली.
