आघाडी सरकारने आषाढी यात्रेला परवानगी द्यावी

Manogat
0

भाजपा प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांची मागणी


औरंगजेबासारख्या मोगल बादशहाने अनेक प्रयत्न करूनही पंढरीची आषाढी यात्रेची परंपरा बंद पडू शकली नाही ती परंपरा मोडण्याचे पाप आघाडी सरकारने करू नये. कोरोना सारख्या आजाराशी  लढा देण्यासाठी समाजाला मानसिक बळ देण्याचे सामर्थ्य असलेल्या आषाढी वारी सारख्या परंपरा यावर्षी सुरु करण्याची परवानगी आघाडी सरकारने द्यावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी सोमवारी केली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत श्री. भांडारी बोलत होते.

 

श्री. भांडारी यांनी सांगितले की, कोरोनाच्या प्रसाराला आळा घालण्यासाठी मागील वर्षी देशव्यापी टाळेबंदी लागू केली होती. वारकरी संप्रदायाने गतवर्षी पंढरीला होणाऱ्या आषाढी, कार्तिकी सह सर्व यात्रा रद्द करण्याचा राज्य शासनाचा निर्णय स्वीकारला आणि सरकारला सहकार्य केले. समूहाने होणारे सर्व अध्यात्मिक, धार्मिक उत्सव प्रथा, परंपरेप्रमाणे साजरे केले नाहीत. आषाढी यात्रेचे हिंदू समाजातील अध्यात्मिक महत्व लक्षात घेऊन औरंगजेबासारख्या मोगल बादशहाने वारीची परंपरा संपविण्यासाठी अनेक प्रयत्न केले. मात्र औरंगजेबासारख्या जुलमी सत्ताधीशालाही न जुमानता वारकरी संप्रदायाने ही परंपरा प्रचंड निष्ठेने सुरु ठेवली. आघाडी सरकारने ही प्रथा बंद करण्याचे पाप करू नये. या विषयाबाबत संपूर्ण मराठी समाजाच्या  तीव्र भावना लक्षात घेता यावर्षी राज्य सरकारने आषाढी यात्रेला परवानगी द्यावी.                     

 

'कोणत्याही जीवाचा न घडो मत्सर 'अशी भागवत धर्माची शिकवण आहे. या शिकवणीनुसार वारकरी संप्रदायाने राज्य शासनाचा निर्णय स्वीकारून वारी, तुकाराम बीज, भजन, कीर्तन, प्रवचन यासारखे  अध्यात्मिक कार्यक्रम साजरे केले नाहीत. नाम चिंतनाने शारीरिक  मानसिक व्याधींशी लढण्याचे मोठे बळ मिळते, हे संशोधनाअंती ही सिद्ध झाले आहे. सध्याच्या घडीला औषधोपचाराबरोबरच समाजाला मानसिक आधाराचीही गरज भासते आहे. समाजाचे अन्य व्यवहार हळूहळू पूर्ववत होत आहेत. अशा स्थितीत आषाढी यात्रेसारखी परंपरा खंडीत करू नये, अशी विनंती सातत्याने होते आहे. ही मागणी राज्य सरकारने मान्य करावी, असेही श्री. भांडारी यांनी यावेळी नमूद केले.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Accept !