पूर्व लडाखच्या पँगाँग सरोवराच्या उत्तर किनाऱ्यावरून तसेच गलवान खोरे आणि घोगरा परिसरातून चिनी सैन्य माघारी घेऊन ते मे 2020 पूर्वीच्या स्थितीत नेण्याचा भारताचा आग्रह चीनने अखेर मान्य केला आहे, त्यामुळे आता लडाखमधील तणाव काही काळ तरी निवळण्याची आशा निर्माण झाली आहे. गेल्या मे महिन्यात चीनने अचानक आक्रमण करून दोन्ही देशांच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरचा निर्मनुष्य भाग व्यापल्याने गेली नऊ महिने दोन्ही देशांत युद्धसदृश्य वातावरण निर्माण झाले होते आणि दोन्ही देशांचे सैन्य बंदुका रोखलेल्या अवस्थेत एकमेकांसमोर सुसज्ज उभे होते.
त्यातूनच गलवान येथे दोन्ही देशांच्या सैन्यात हाणामारी होऊन भारताचे 20 तर चीनचे अनधिकृत अंदाजानुसार 45 ते 100 सैनिक ठार झाले होते. असे असले तरी दोन्ही देशांत लष्करी पातळीवर चर्चा चालू होती व या चर्चेत चीनने आपले सैन्य मे पूर्व स्थितीत मागे घ्यावे अशी मागणी भारताने सतत लावून धरली होती. चीनने सुरुवातीला या चर्चेत भारताच्या मागणीला वाटाण्याच्या अक्षता लावल्या व माघार घेण्यास ठाम नकार दिला, उलट भारतानेच माघार घ्यावी अशी मागणी केली.
पण ऑगस्ट महिन्यात भारतीय सैन्याने कैलास पर्वतशिखरे काबिज करून चीनचा मोल्डो हा लष्करी तळ भारतीय तोफखान्याच्या मार्यानच्या टप्प्यात आणल्यानंतर चीन नरमला. तरीही त्याने माघारीस नकारच दिला. पण नंतर भारतीय सैन्याला मागे ढकलून अधिक प्रदेश काबीज करणे चीनला अशक्य झाले. त्यातच लडाखमधला गोठवून टाकणारा हिवाळा सुरू झाला. त्यात चिनी सैनिक आजारी पडू लागले. त्यामुळे या भागात आक्रमण करण्याचा चीनचा हेतू विफल झाला.
परिणामी चीनने आता सैन्य मागे घेण्याची भारताची मागणी मान्य केली आहे. याबाबत झालेल्या समझोत्यानुसार आता चीन पँगाँगत्सो परिसरात फिंगर 8 या नावाने ओळखल्या जाणार्या डोंगराच्या उत्तरेकडे आपले सैन्य माघारी नेइल तर भारत फिंगर 3 या डोंगरापर्यंत आपले सैन्य मागे घेइल. या तडजोडीत भारताने काहीच गमावलेले नाही. भारताचा दावा फिंगर चारपर्यंत आहे तर चीनचा दावा फिंगर चार ओलांडून भारताच्या प्रदेशापर्यंत आहे. पण या तडजोडीनुससार चीनला फिंगर आठच्या मागे जावे लागेल.
आता फिंगर चार ते आठ या दरम्यानचा प्रदेश निर्मनुष्य राहील व सध्यातरी तेथे कुणालाच गस्तही घालता येणार नाही. गेल्या नऊ महिन्यात या भागात दोन्ही बाजूंनी काही बांधकामे केली असतील वा काही सुविधा निर्माण केल्या असतील तर त्याना त्या नष्ट कराव्या लागतील. भारताने कैलास पर्वतशिखरे काबीज केली असली तरी ती भारतीय प्रदेशातच आहेत, त्यामुळे ती सोडण्याचा प्रश्न च नाही, पण आता शिखरावरील सैन्याची जमवाजमव भारत टप्प्याटप्प्याने मागे घेइल. सध्या तरी प्रथम या भागातून तसेच गलवान व घोगरा भागातून दोन्ही देश आपले रणगाडे व चिलखती वाहने मागे घेतील. हे काम पूर्ण व समाधानकारक झाले आहे अशी खात्री पटली तरच मग सैन्य मागे घेण्याचे काम सुरू होईल.
आता प्रश्नत असा निर्माण होतो की, चीनने हे आक्रमण का केले व त्यातून काय साधले? तसेच पुन्हा चीन असे दु:साहस करणार नाही याची हमी काय? खरे तर दोन्ही देशांत सौहार्दपूर्ण संबंध असताना चीनने हे आक्रमण का केले हे एक कोडेच आहे.
चीनने या आक्रमणाचा हेतू अद्याप जाहीर केला नाही अथवा भारताकडे निश्चि त अशी काही मागणीही ठेवली नाही. पण चीनचे भूतपूर्व पंतप्रधान चौ एन लाय यांनी सुचवलेली 1959ची भारत-चीन सीमा भारताने आतातरी मान्य करावी या मागणीसाठी चीनने हे आक्रमण केले असावे असा एक अंदाज आहे.
दुसरा अंदाज असा आहे की, भारताने काश्मीरसंबंधीचे 370 कलम रद्द केल्याने लडाख या भागावर भारताने केलेला दावा खोडून काढण्यासाठी चीनने हे आक्रमण केले असावे. तिसरा अंदाज असा आहे की, भारत आणि अमेरिका हे दोन देश चीनविरोधात एकत्र येत आहेत, त्यामुळे भारताला धडा शिकवण्यासाठी चीनने हे आक्रमण केले असावे. आणखी एक कारण असेही सांगितले जाते की, भारताने लडाख व अरुणाचल प्रदेशात मोठ्या प्रमाणात रस्तेबांधणी व पायाभूत सुविधा उभारणीचे काम सुरू केल्यामुळे भारताच्या आक्रमणाचा धोका वाढला आहे, त्यामुळे चीनने आक्रमण केले असावे. यातले नेमके कोणते कारण खरे हे चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यानाच माहीत. पण मे मध्ये भारतावर आक्रमण करून नऊ महिने युद्धजन्य वातावरण निर्माण करून भारताने चीनची यातली एकही मागणी मान्य केलेली नाही. याचा अर्थ चीनचे हे आक्रमण सध्यातरी निरर्थक ठरले आहे. ‘सध्यातरी निरर्थक ठरले आहे’ असे म्हणण्याचे कारण हे की, चीनच्या पदरी आता अपयश आले म्हणून तो हताश होणारा देश नाही. तो पुन्हा पूर्ण तयारी करून या मागण्यांसाठी भारतावर फेरआक्रमण करण्याची शक्यता अजिबात नाकारता येत नाही. चीनची आर्थिक शक्ती ही भारताच्या पाचपट व लष्करी शक्ती ही भारताच्या तिप्पट आहे. तो सहजासहजी हार मानणारा देश नाही. त्यामुळे चीनच्या सध्याच्या माघारीचा उपयोग भारताला चीनच्या पुढच्या आक्रमणाला तोंड देण्याची तयारी करण्यासाठी करायचा आहे.
या आक्रमणात केलेल्या चुका टाळून नव्या तयारीनिशी चीन आक्रमण करणार हे निश्चिीत आहे, याची जाणीव भारतीय लष्कर व राज्यकर्ते यांना नक्कीच आहे व तेही या तात्पुरत्या शांततेचा उपयोग चीनविरुद्धचे लष्करी व आर्थिक सामर्थ्य वाढविण्यासाठी करतील यात काही शंका नाही. या तडजोडीबाबत एक शंका कुणाच्याही मनात येइल ती म्हणजे, डेपसांग परिसराचा या तडजोडीत समावेश का नाही, ही. डेपसांग परिसरातील भारतीय प्रदेशात चीनने आक्रमण केले आहे हे खरे आहे, पण हे आक्रमण 2011 साली केले आहे व तो वाद तेव्हापासून आहे. सध्याची तडजोड ही फक्त मे 2020 मध्ये गलवान, पँगाँगत्सो व घोगरा परिसरात झालेल्या आक्रमणापुरती मर्यादीत आहे. भारताने एक लढाइ जिंकली असली तरी युद्ध अद्याप जिंकायचे आहे, हे लक्षात ठेवलेले बरे!
- दिवाकर देशपांडे
परराष्ट्र नीती अभ्यासक