सरकारला प्रश्न विचारणाऱ्या पत्रकाराला अटक आणीबाणीची आठवण करून देणारी

Manogat
0

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांची प्रतिक्रिया


राज्यातील महाविकास आघाडीच्या अपयशाबद्दल आणि चुकांबद्दल जाहीर सवाल करणारे पत्रकार अर्णब गोस्वामी यांना पोलिसांकरवी अटक करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारने घटनेने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा घोटला आहे. ठाकरे सरकारची ही कृती आणीबाणीबातील दडपशाहीची आठवण करून देणारी आहे. भारतीय जनता पार्टी या दडपशाहीचा निषेध करते, असे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले.

 

चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, पत्रकार अर्णब गोस्वामी यांना अटक करून प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारांवर दडपशाही करण्याचा भाजपा निषेध करते. संविधानाच्या मूल्यांवर विश्वास असणाऱ्या सर्वांनी या प्रसंगी ठाकरे सरकारचा निषेध केला पाहिजे व घटनात्मक चौकटीत आणि कायदेशीर मार्गानेच काम करण्याचा आग्रह धरला पाहिजे. भाजपाचे कार्यकर्ते राज्यभर या अत्याचाराचा निषेध करतील. त्याचबरोबर लोकशाहीच्या रक्षणासाठी सर्व सुजाण नागरिकांनी आपापल्या पद्धतीने राज्य सरकारचा निषेध करावा. राज्य सरकारच्या विरोधात आंदोलन, उपोषण, सरकारी कामकाजात असहयोग, सोशल मीडियावर आवाज उठवणे, मोर्चा काढणे, अशा शक्य त्या मार्गाने निषेध करावा.

 

त्यांनी सांगितले की, अर्णब गोस्वामी यांनी विचारलेल्या प्रश्नांमुळे अडचण झालेल्या ठाकरे सरकारने एका वास्तूविशारदाच्या आत्महत्येचे जुने प्रकरण उकरून काढून गोस्वामी यांना अटक केली. खरे तर या प्रकरणाचा तपास 2018 साली बंद झाला होता. राज्य सरकारला पुन्हा तपास करायचा असेल तरी त्यासाठी घटनेची चौकट आणि कायदेशीर प्रक्रिया यांचे पालन केलेच पाहिजे. तपासाच्या नावाखाली अत्याचार करणे ही केवळ मुस्कटदाबी आहे.

 

ते म्हणाले की, पालघर जिल्ह्यात पोलिसांच्या साक्षीने जमावाने साधूंची हत्या करणे किंवा सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरण अशा प्रकरणात पत्रकार अर्णब गोस्वामी यांनी स्पष्टपणे व ठामपणे प्रश्न विचारून ठाकरे सरकारचे अपयश चव्हाट्यावर आणले होते. एक निर्भिड आणि रोखठोक पत्रकार म्हणून अर्णब गोस्वामी आपले काम करत असताना ठाकरे सरकारने सूडबुद्धीने अर्णब गोस्वामी यांना अटक केली. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशावर आणीबाणी लादली त्यावेळी सरकारचे अपयश आणि अत्याचार लपविण्यासाठी प्रसिद्धी माध्यमांवर वरवंटा फिरविण्यात आला आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी केली गेली. त्याच पद्धतीने काँग्रेसच्या पावलावर पाऊल ठेऊन ठाकरे सरकारने महाराष्ट्रात माध्यमांची गळचेपी सुरू केली आहे. पत्रकारांना अटक करून खटले दाखल करण्याचे प्रकार या सरकारने सुरू केले आहेत. त्यासाठी कोणत्याही घटनेचे निमित्त केले जात आहे. मुख्यमंत्रीपदाच्या लोभाने काँग्रेससोबत आघाडी केल्यानंतर शिवसेनेने काँग्रेसची आणीबाणीची हुकुमशाही मानसिकता स्वीकारल्याचे दिसते. पंचेचाळीस वर्षांपूर्वी जनसंघाच्या कार्यकर्त्यांनी आणीबाणीच्या विरोधात लढा दिला. आजही आम्ही लोकशाहीच्या रक्षणासाठी संघर्ष करू असे चंद्रकांतदादा पाटील यांनी म्हटले आहे.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Accept !