भाजपा अल्पसंख्याक मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष सिद्दीकी यांची माहिती
मुस्लीम समाजात भारतीय जनता पार्टीबद्दल वर्षानुवर्षे असणारे गैरसमज दूर करण्याचे काम अल्पसंख्याक मोर्चाच्या माध्यमातून केले जात आहे. या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नवभारताचे स्वप्न साकार करण्याच्या प्रयत्नांना आम्ही हातभार लावत आहोत, असे भाजपा अल्पसंख्याक मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांनी गुरुवारी सांगितले.
भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार
परिषदेत ते बोलत होते. प्रदेश माध्यम विभाग प्रमुख विश्वास पाठक, महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षा रिधा रशीद, अल्पसंख्याक
मोर्चाचे मुंबई अध्यक्ष वासिम खान आदी यावेळी उपस्थित होते.
अल्पसंख्याक मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी
नियुक्ती झाल्यानंतर श्री. सिद्दीकी हे प्रथमच मुंबईत आले. ते म्हणाले की, अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर आपण अनेक राज्यांचा दौरा केला. भारतीय
जनता पार्टीबद्दल मुस्लीम समुदायाच्या मनात गैरसमज पेरण्यात आले आहेत. हे गैरसमज
दूर करण्याचे काम अल्पसंख्याक मोर्चाच्या माध्यमातून हाती घेण्यात आले आहे. मोदी
सरकारने मुस्लीम धर्मियांच्या कल्याणासाठी अनेक निर्णय घेतले आहेत. या निर्णयांची
माहितीही मुस्लीम धर्मियांपर्यंत पोहचविली जात आहे.
मतपेढीचे राजकारण करणाऱ्या काँग्रेस व अन्य
तथाकथित पुरोगामी राजकीय पक्षांनी मुस्लिमांना न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न
कधीच केला नाही. देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात अल्पसंख्याक आयोगाची स्थापना
झाली. काँग्रेस-शिवसेना-राष्ट्रवादी आघाडी सरकारने मुस्लिमांसाठीच्या सरकारी
महामंडळांवरील नियुक्त्याही अजून केलेल्या नसल्याचे श्री. सिद्दीकी यांनी निदर्शनास
आणून दिले.