शेतकऱ्यांना सुलभरीत्या पीककर्ज मिळावे, बँक
अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार थांबविण्यासाठी भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाच्या
पीककर्ज सहाय्यता आंदोलनाला आजपासून राज्यभरात सुरूवात झाली आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही शेतकरी
बांधवांना त्यांच्या हक्कांचे पीक कर्ज मिळवून देणार असे प्रतिपादन माजी
कृषिमंत्री व भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष डॉ. अनिल बोंडे यांनी केले आहे.
डॉ. अनिल बोंडे यांच्या नेतृत्वाखाली नांदगाव पेठ येथील युनियन बँक
व माहुली येथील बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये आंदोलन
केले. यावेळी अमरावती ग्रामिणच्या जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी-बिगरे उपस्थित
होत्या. करमाळा,
सोलापूर, कोल्हापूर, कराड,
सातारा, बुलडाणा, जालना,
नांदेड आणि परभणीसह राज्यभर भाजपा किसान मोर्चातर्फे आंदोलन करण्यात
आले.
श्री. बोंडे म्हणाले की, खरीपाचा हंगाम संपत आला असून
अजूनही शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा केलेला नाही. कर्जमाफीच्या यादीत नाव आल्यानंतर
याद्या तपासल्यावरही अनावश्यक कागदपत्रांची मागणी करून बँक कर्मचारी शेतकऱ्यांना
जेरीस आणत आहेत. शासनाच्या आदेशालाही या बँक अधिकाऱ्यांनी केराची टोपली दाखविली
आहे. बँक कर्मचाऱ्यांच्या या मनमानी कारभारामुळे व राज्य सरकारच्या दुर्लक्षतेमुळे
शेतकरी बांधवाला कर्ज मिळत नाहीये. विदर्भात आत्तापर्यंत 30 टक्क्यांहून कमी
कर्जपूरवठा करण्यात आला आहे. या अडचणींना वैतागुन शेतकरी गळ्याला फास लावून घेतो.
मात्र यापुढे शेतकऱ्यांच्या गळ्यातला फास बँक अधिकाऱ्यांच्या गळ्याला लावू असे
म्हणत बँक अधिकाऱ्यांना कर्ज वितरणासाठी फक्त आवश्यक कागदपत्रे घेण्यासाठीच बाध्य
करणार आणि कर्ज माफीनंतरचे व्याज बँकांनी घेवू नये अशी मागणी डॉ. बोंडे यांनी
केली.
