‘कोरोना रिपोर्ट पोझिटिव्ह नको असेल तर फाटके कपडे घाला’ असे वक्तव्य करून काँग्रेसचे नेते व माजी गृहराज्यमंत्री सिध्दराम म्हेत्रे यांनी रुग्णांना लुटणाऱ्या खासगी रुग्णालयांना चाप लावण्यात महाआघाडी सरकार अपयशी ठरले आहे यावर शिक्कामोर्तब झाले आहे, अशी टीका प्रदेश भाजपा मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली आहे.
माजी गृहराज्यमंत्री सिध्दराम म्हेत्रे यांनी
काँग्रेसच्या सोलापूरच्या बैठकीत ''चांगले कपडे घातले, सूट, बूट घातलं की त्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह येतात.
फाटके कपडे घातले की त्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह येत नाहीत. त्यांचे रिपोर्ट
निगेटिव्हचं येतात. अशी सगळी कोविडची परिस्थिती आहे. त्यामुळे या कोरोनाला
घाबरण्याची गरज नाहीये. कोविड पॉझिटिव्ह नको असेल तर फाटके कपडे घाला." असे
वक्तव्य केले आहे. एका
जबाबदार व्यक्तीच्या तोंडून निघणाऱ्या या वक्तव्यावरून कोरोना चाचणी
प्रक्रियेमध्ये काळबेरं आहे, सामान्य लोकांच्या जीवाशी कसा खेळ चालला आहे हे
दिसून येतं, असे श्री. उपाध्ये यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्र्यांनी जर मातोश्रीबाहेर पडून
ठिकठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन माहिती घेतली तर प्रशासनावर आणि आरोग्य यंत्रणेवर
धाक राहिल. प्रत्यक्ष काम करण्याची गरज असते. प्रत्यक्ष कृती केल्याने ज्ञानात आणि
अनुभवातही भर पडते हे मुख्यमंत्र्यांनी लक्षात घ्यावे.
आधिच खासगी रूग्णालयांकडून, विलगीकरण केंद्राकडून रूग्णांकडून भरपूर पैसा
उकळला जातो. रूग्णालयांत रूग्णांची प्रचंड गैरसोय होत आहे, विलगीकरण केंद्रात महिला असुरक्षित आहेत, खासगी लॅबमध्ये रिपोर्टशी खोडसाळपणा होतोय अशात
या सामान्य जनतेने कुणाकडे दाद मागावी? कुटुंबातल्या एका व्यक्तींचा रिपोर्ट पॉझिटिव्ह
आला तर त्या कुटुंबाला आर्थिक फटका तर बसतोच पण प्रचंड मानसिक त्रासालाही सामोरे
जावे लागते. अशात चाचणी करायला आलेल्या व्यक्तीचे राहणीमान पाहून रिपोर्ट
पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह दिला जात असेल तर सरकार आणि आरोग्य यंत्रणेने जनतेच्या
जीवाचाच खेळ मांडला आहे असेच म्हणावे लागेल असे श्री. उपाध्ये यांनी
प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
