देवेंद्र फडणवीस यांची भावना; प्रदेश कार्यालयात झाला आनंदोत्सव
अयोध्या येथे राम
मंदिराच्या भूमिपूजनामुळे अनेक पिढ्यांनी वर्षानुवर्षे पाहिलेले स्वप्न प्रत्यक्षात आले. या क्षणाचा
साक्षीदार होता आले, ही भाग्याची गोष्ट आहे, अशा
शब्दांत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
राम मंदिर भूमीपूजनानिमित्त भाजपा प्रदेश कार्यालयात आयोजित
केलेल्या आनंदोत्सव प्रसंगी श्री.फडणवीस बोलत होते. यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा
पाटील, राष्ट्रीय
सह संघटन मंत्री व्ही. सतीश, प्रदेश संघटन मंत्री विजयराव
पुराणिक, माजी मंत्री विनोद तावडे , आशिष
शेलार आदी उपस्थित होते.
श्री.फडणवीस म्हणाले की, प्रभू रामचंद्र हे देशाचे
आराध्य दैवत आहे. सामान्य माणसातील पौरुषत्व जागे करून असुरी शक्तींचा पराभव
करणाऱ्या प्रभू रामचंद्राने आदर्श राज्य कसे करावे हेही दाखवून दिले. अशा प्रभू
रामचंद्रांचे मंदिर अयोध्येत व्हावे हे अनेक वर्षांपासूनचे स्वप्न आज पूर्ण झाले
आहे. हा क्षण 'याची देहा याची डोळा' अनुभवता
आल्याने मी स्वतःला भाग्यवान समजतो.
यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रामाच्या प्रतिमेचे पूजन
करण्यात आले.
भूमिपूजना निमित्त भाजपा प्रदेश कार्यालयात भजनाचे आयोजन करण्यात आले होते.