विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्यानंतर
देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या भाषणाचा संपादित अंश...
मा. अध्यक्ष महोदय, राज्य
विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी आपण माझी निवड केली याबद्दल मी आपणा सर्वांचे
मन:पूर्वक आभार मानतो. विधानसभेतील विरोधी पक्षनेता हे अत्यंत महत्वाचे पद आहे.
यानिमित्ताने मी नूतन सरकार आणि नवीन मुख्यमंत्र्यांचे मन:पूर्वक अभिनंदन करतो. अनेक
वर्षे आमच्या साथीत राहिलेल्या मित्र पक्षाला मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी मिळाली,
याचा मला मोठा आनंद होत आहे. आमच्या संबंधात काहीवेळा चढउतार आले
असतील, पण आम्ही अनेक वर्षे युती म्हणून काम पाहिले.
त्यामुळे आमचा मित्र सत्तेत बसला याचा राजकारणापलिकडे जाऊन आम्हाला आनंद झाला आहे.
आम्ही अनेक वर्षे विरोधी पक्षात बसून एकत्रित काम केले आहे. साहजिकच आमचा ‘डीएनए‘ विरोधी पक्षाचा आहे, असे
म्हटले जाते.
मी सलग 15 वर्षे विधानसभेत विरोधी बाकांवरून काम
करताना सभागृहाने पाहिले आहे. या काळात मी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानुसार
वर्तन केले आहे. संविधानापलिकडे जाऊन मी कोणतेही काम केले नाही आणि करणार नाही.
विश्वासदर्शक ठरावावर चर्चा होण्यापूर्वी मी केलेल्या काही विधानांवरून सत्ताधारी
पक्षाच्या काही मंडळींनी जाणीवपूर्वक वेगळा अर्थ काढला आहे. माझ्या विधानाबाबत
हेतूपूर्वक गैरसमज निर्माण करण्याचे प्रयत्न चालू आहेत. त्यामुळे यासंदर्भात
खुलासा करणे आवश्यक समजतो. शपथविधीवेळी छत्रपती शिवाजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले,
सावित्रीबाई फुले, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब
ठाकरे यांची नावे घेण्यास कोणाचाही आक्षेप नाही. मात्र डॉ.आंबेडकर यांनी संविधानात
मंत्र्यांचा शपथविधी कसा व्हावा यासंदर्भात ज्या मार्गदर्शक सूचना केल्या आहेत
त्याचे पालन आपल्याकडून होणे अपेक्षित आहे. डॉ. आंबेडकरांच्या घटनेपासून कोणी
वेगळे वर्तन करण्याचा प्रयत्न केला तर त्याला विरोधी पक्षनेता या नात्याने मी
रोखण्याचा प्रयत्न करणारच.
मी जे काही बोललो त्यावरून भलते-सलते अर्थ काढले
गेले. म्हणूनच मला संविधान आणि आपल्या समाजाची दैवत यासंदर्भात जे काही सांगायचे
होते ते आज सांगितले. ‘मी पुन्हा येईन‘ असे सभागृहात सांगितले होते. मी पुन्हा आलोच आहे. महाराष्ट्रातील जनतेने
आम्हाला सर्वाधिक जागा जिंकून दिल्या आहेत. आम्ही लढलेल्या जागांपैकी 105 जागांवर
जिंकून आलो आहोत, याचा अर्थ आम्ही 70 टक्क्यांपेक्षा अधिक
गुण मिळवत वर्गात सर्वप्रथम आलो आहोत. मात्र 40-40 टक्के गुण मिळवणारे तिघेजण
एकत्र येऊन 120 टक्क्यांचा दावा करत आज सत्तेवर आले आहेत. याला तर लोकशाही
म्हणतात. कालपर्यंत जे आमच्याबरोबर होते ते समोरच्या बाजूला जाऊन मिळाले आणि या
तिघांनी सत्ता स्थापन केली. कालपर्यंत मित्र असणारे आज एकमेकांचे विरोधी झाले आणि
कालपर्यंत ज्यांना विरोध केला त्यांच्याच बाजूला काहीजण जाऊन बसले.
लोकशाहीत अशा घडामोडी घडणारच. ‘मी पुन्हा येईन‘ असे म्हणताना मी केव्हा परत येणार
याच वेळापत्रक दिले नव्हते, असे फार तर म्हणता येईल. जनतेने
आम्हालाच जनादेश दिला होता. तो काही कारणांमुळे आम्हाला पूर्ण करता आला नाही,
याचे आम्हाला जरूर दु:ख आहे. पण अजूनही एक गोष्ट लक्षात ठेवा,
अशा गोष्टी लोकशाहीत होत असतात. लोकशाहीत विरोधी पक्षाला अनन्य
साधारण महत्वाचे स्थान आहे. सत्ताधारी पक्षाइतकेच विरोधी पक्षाचे स्थान महत्वाचे
आहे. विरोधी पक्षात राहून सत्ताधारी पक्षावर अंकुश ठेवण्याचे काम आमचे आहे.
सत्ताधारी पक्षात असताना आम्ही विरोधी पक्षाकडे कधीच शत्रू म्हणून पाहिले नाही.
महाराष्ट्राला विरोधी पक्ष नेत्याची गौरवशाली परंपरा लाभली आहे. कृष्णराव धुळप,
गणपतराव देशमुख, मृणालताई गोरे, निहाल अहमद, शरद पवार, बबनराव
ढाकणे, दत्ता पाटील, गोपीनाथ मुंडे,
नारायण राणे अशी विरोधी पक्षनेत्यांची मोठी परंपरा महाराष्ट्राला
लाभली आहे. याच परंपरेला साजेसे वर्तन मी करीन, याची ग्वाही
यानिमित्ताने देतो. जनहितासाठी सरकार जी-जी धोरणे आखेल त्याला आमचा पाठिंबा राहिल.
मात्र ज्या ठिकाणी सरकार जनहिताच्या विरोधात जाऊन कारभार करत आहे, असे दिसून येईल त्या ठिकाणी आम्ही सरकारच्या विरोधात ठामपणे उभे राहू,
हे मी सांगू इच्छितो. नव्या सरकारचे आणि नव्या मुख्यमंत्र्याचे
पुन्हा एकदा अभिनंदन.
