ऑक्सिजन स्वयंपूर्णतेबाबत नंदुरबारच्या जिल्हाधिकाऱ्यांची थापेबाजी

Manogat
0

‘भाजपा’च्या राष्ट्रीय प्रवक्त्या खा. डॉ. हीना गावीत यांची जोरदार टीका


नंदुरबार जिल्हा ऑक्सिजन बाबत स्वयंपूर्ण झाला असल्याचा जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी केलेले दावे फसवे असून अजूनही नंदुरबार जिल्ह्याला धुळे जिल्ह्यातून ऑक्सिजनचा पुरवठा चालू आहे. शिवसेनेच्या माजी आमदारांना 1 हजार रेमडीसीवर इंजेक्शन विक्रीस देण्याच्या प्रकरणावरून अन्यत्र लक्ष वळविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी खोट्या बातम्या पसरवण्याचा उद्योग सुरु केला आहे, अशी टीका भाजपाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या खा. डॉ.हीना गावीत यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे. कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता गृहीत धरून जिल्ह्यात ऑक्सिजन निर्मिती सुरु केली असे सांगणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांना ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प एप्रिल मध्ये सुरु झाल्याचा विसर पडला का, असा सवालही त्यांनी केला आहे.

खा. डॉ.गावीत यांनी पत्रकात म्हटले आहे की, जिल्हाधिकारी डॉ भारूड यांनी अलीकडेच प्रसारमाध्यमांद्वारे नंदुरबार जिल्हा ऑक्सिजनबाबत स्वयंपूर्ण झाला असल्याचा दावा केला आहे. हा दावा करताना जिल्हाधिकाऱ्यांनी तळोदा, नवापूर आदी ठिकाणचे ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प सुरु झाले असल्याचे सांगितले होते. प्रत्यक्षात या ठिकाणी प्रकल्पाचे काम सुरूच झालेले नाही असे पाहणीत दिसून आले आहे. नंदुरबार जिल्ह्यात एप्रिल मध्ये 2 ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प सुरु झाले. यातून तयार होणाऱ्या ऑक्सिजनमधून जिल्ह्याची निम्मी गरज भागते आहे. धुळे येथून नंदुरबार जिल्ह्याला प्रशासकीय व्यवस्थेतून दररोज जवळपास 2 टन ऑक्सिजन पुरवठा होतो आहे. या शिवाय खासगी क्षेत्रातून होणारा पुरवठा वेगळा आहे.

गोरगरीबांना देण्यासाठी कंपन्यांच्या सीएसआर फंडातून मिळालेले 1 हजार रेमडीसीवर जिल्हाधिकाऱ्यांनी शिवसेनेचे माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्याशी संबंधित संस्थेला विक्रीसाठी देण्याचा उद्योग केला आहे. हा उद्योग अंगाशी येण्याची चिन्हे दिसू लागल्याने जनतेचे लक्ष अन्यत्र वळविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी ऑक्सिजन स्वयंपूर्णतेची कथा रचली आहे. मात्र सामान्य माणूस यावर विश्वास ठेवणार नाही, असेही खा. गावीत यांनी म्हटले आहे.

सध्या जिल्ह्यात ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प सुरु आहेत त्याला जिल्हा नियोजन व विकास मंडळाने मान्यता दिली आहे. ज्येष्ठ नेते आ. डॉ. विजयकुमार गावीत यांनी आपल्या आमदार निधीतून 20 लाख रु. देण्याचे पत्र प्रशासनाला दिले आहे, असेही खा. हीना गावीत यांनी नमूद केले आहे.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Accept !