पूजा चव्हाणच्या संशयास्पद मृत्यूची सरकार चौकशी करणार आहे की नाही?

Manogat
0

भाजपा प्रदेश महिला मोर्चा अध्यक्ष उमा खापरे यांचा सवाल

 


पूजा चव्हाण या तरुणीच्या संशयास्पद मृत्यूची राज्य सरकार चौकशी करणार आहे की नाही असा सवाल भाजपा प्रदेश महिला मोर्चाच्या अध्यक्ष  उमा खापरे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत  केला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेला भाजपा प्रदेश उपाध्यक्ष माधवराव भांडारी, ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर, युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील उपस्थित होते. पूजाच्या मृत्यूची चौकशीची घोषणा तातडीने केली नाही व तोपर्यंत  वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा घेतला नाही तर महिला मोर्चातर्फे शनिवार 27 फेब्रुवारी रोजी राज्यभर चक्का जाम आंदोलन करण्यात येईल, असेही श्रीमती खापरे यांनी यावेळी जाहीर केले.

 

पूजा चव्हाणचा 7 फेब्रुवारी रोजी मृत्यू झाला. पूजाच्या मृत्यूला 19 दिवस उलटून गेले तरी पोलिसांनी या घटनेबाबत प्राथमिक माहिती अहवालही दाखल केला नाही. पूजाच्या ऑडिओ क्लिपमधील संवादावरून संबंधित व्यक्तींची पोलिसांनी साधी चौकशीही केलेली नाही. पोलीस हाताची घडी , तोंडावर बोट ठेवून गप्प बसले आहेत. याचा अर्थ पोलिसांवर सत्ताधाऱ्यांचा दबाव आहे, असेही श्रीमती खापरे यांनी सांगितले .

 

श्रीमती खापरे म्हणाल्या की, महिलांच्या प्रतिष्ठेबाबत सातत्याने बोलणारे पुरोगामी नेते शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कारभार करणाऱ्या सरकारच्या काळात एका तरुणीच्या मृत्यूकडे इतक्या असंवेदनशील पद्धतीने पाहिले जात आहे याची खंत वाटते. पूजा चव्हाणच्या मृत्यूबाबत जे जे पुरावे बाहेर आले आहेत त्या सर्व पुराव्यांतून या प्रकरणाशी राठोड यांचा संबंध आहे हेच दिसून येते. मात्र मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडून राठोड यांना अभय दिले जात असल्याचेही दिसून येते आहे.  मुख्यमंत्र्यांनी राठोड यांचा तातडीने राजीनामा घ्यावा, राठोड यांनी राजीनामा दिला नाही तर त्यांना मंत्रीमंडळातून बडतर्फ करावे.  राठोड यांचा राजीनामा घेतला जात नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन चालूच ठेवू.

 

श्रीमती खापरे यांनी पुढे सांगितले की, केवळ सत्ताधारी पक्षाचा नेता आणि मंत्री असल्याने त्यांना वाचवण्याचे प्रयत्न केले जात आहेत. पूजाच्या संशयास्पद मृत्यूवेळी तिच्याबरोबर असलेले दोघे कुठे गेले याचा तपास करण्याची गरजही पोलिसांना वाटू नये, हे धक्कादायक  आहे. पूजाच्या संशयास्पद मृत्यूची चौकशी वानवडी पोलिसांकडून काढून घेऊन उच्चपदस्थ पोलीस अधिकाऱ्यांकडून केली जावी, अशी महिला मोर्चाची मागणी आहे.

 

या मुद्द्यावर भाजपा ओबीसी मोर्चा आणि भाजपा युवा मोर्चातर्फे राज्यभर स्वतंत्ररित्या आंदोलन करण्यात येईल,  असे ओबीसी मोर्चा अध्यक्ष योगेश टिळेकर व युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष  विक्रांत  पाटील यांनी यावेळी सांगितले.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Accept !