भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांची प्रतिक्रिया
अर्णब गोस्वामी आणि कंगना राणावत यांच्या बाबतीत शुक्रवारी
न्यायालयाने दिलेले निकाल म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील
राज्यातील शिवसेना - काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारला
थप्पड असून आता तरी सत्तेचा अहंकार सोडावा आणि धमक्या देणे बंद करावे, अशी
प्रतिक्रिया भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त
केली.
श्री. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, राज्यात
जनादेश धुडकावून लबाडीने सत्ता मिळवली तरीही संविधानाच्या चौकटीत आणि लोकशाही
पद्धतीनेच काम करावे लागेल. एखाद्यावर कारवाई करायची असेल तरीही संविधान आणि कायदा
यांच्या चौकटीतच करावी लागेल. रस्त्यावरील गुंडगिरीच्या मानसिकतेने वागून चालणार
नाही, एवढा बोध या निमित्ताने सत्ताधारी आघाडीच्या
प्रमुखांनी घ्यावा आणि मुखपत्रातून धमक्या देणे बंद करावे.
ते म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने अर्णब गोस्वामी यांना यापूर्वी अंतरिम जामीन मंजूर करताना दिलेल्या निर्णयाबद्दलचे सविस्तर निकालपत्र आज जाहीर केले तर मुंबई उच्च न्यायालयाने कंगना राणावत हिचे कार्यालय पाडण्याबाबत आज निर्णय दिला. या दोन्ही निर्णयात महाविकास आघाडीची सूडबुद्धी आणि आपल्याविरोधात बोलणाऱ्यांचा आवाज दाबण्यासाठी सत्तेचा दुरुपयोग करणे स्पष्ट झाले आहे. कंगना राणावत हिचे मुंबईबद्दलचे विधान समर्थनीय नाही पण त्यावर लोकशाही पद्धतीनेच उत्तर द्यायला हवे. एखादी व्यक्ती आपल्याला प्रश्न विचारते म्हणून किंवा आव्हान देते म्हणून सत्तेचा दुरुपयोग करून त्याचे नुकसान करणे योग्य नाही. अशा पद्धतीने विरोधकांचा आवाज दाबता येणार नाही. देशात संविधान प्रमाण आहे आणि लोकशाही व्यवस्था अंतिम आहे व त्याचे उल्लंघन कोणालाच करता येणार नाही.
