सरकारच्या उपायांमुळे अर्थव्यवस्था पुन्हा गतिमान होईल

Manogat
0

केंद्रीय अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर यांचा विश्वास


लॉकडाऊनच्या काळात अर्थव्यवस्थेच्या वाढीला खीळ बसली असली तरी  आत्मनिर्भर पॅकेजच्या माध्यमातून लोकांची क्रयशक्ती वाढण्यास मदत झाली आहे. आगामी काळात सरकारच्या उपायांमुळे सामान्य जनतेच्या हातात आणखी पैसा येईल आणि त्याचा परिणाम अर्थव्यवस्थेचे चक्र आणखी गतिमान होण्यास होईल, असा विश्वास केंद्रीय अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी शुक्रवारी व्यक्त केला.

 

भारतीय जनता पार्टी प्रदेश शाखेने प्रवक्ते आणि पॅनेलीस्ट साठी सुरु केलेल्या प्रमोद महाजन संवाद मालेतील पहिले पुष्प गुंफताना श्री.ठाकूर यांनी अर्थव्यवस्थेच्या सद्यस्थितीबाबत भाष्य केले. या संवादमालेचे उद्घाटन भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते झाले. केंद्रीय सहसंघटन मंत्री व्ही. सतीश, प्रदेश संघटन मंत्री विजयराव पुराणिक आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी प्रास्ताविक करताना ही संवादमाला सुरु करण्यामागची भूमिका स्पष्ट केली.  प्रदेश माध्यम विभागाचे प्रमुख विश्वास पाठक यांनी आभार मानले. पक्षाचे राज्यभरातील प्रवक्ते या संवादमालेला उपस्थित होते.

 

श्री.ठाकूर यांनी लॉकडाऊनमुळे उद्भवलेल्या अर्थव्यवस्थेपुढे उभ्या राहिलेल्या आव्हानांचा विस्ताराने आढावा घेत केंद्र सरकारने आत्मनिर्भर अभियान व गरीब कल्याण पॅकेजच्या माध्यमातून केलेल्या उपाययोजनांचीही माहिती दिली. अर्थव्यवस्थेचा मुख्य घटक असलेल्या मध्यम, सूक्ष्म आणि लघु उद्योगांच्या मदतीसाठी या क्षेत्रातील उद्योगांनी घेतलेल्या कर्जाच्या २० टक्के रक्कम खेळते भांडवल म्हणून उपलब्ध करून दिली आहे. या योजनेद्वारे १ लाख ११ हजार कोटी रु. उद्योजकांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आले आहेत. या योजनेद्वारे ३ लाख कोटी रु. वितरीत करण्यात येणार आहेत. मध्यम, लघु व सूक्ष्म उद्योगांची व्याख्या बदलल्याने या क्षेत्रातील उद्योगांना सरकारी योजनांचे अनेक फायदे मिळणार आहेत.

 

पंतप्रधान गरीब कल्याण योजनेद्वारे ८० कोटी जनतेला मोफत अन्नधान्य, उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना मोफत सिलेंडर, किसान सन्मान योजनेतून शेतकऱ्यांना थेट मदत, किसान क्रेडिट कार्ड द्वारे शेतकऱ्यांना अडीच लाख रु. अल्प व्याजदरात कर्ज, दिव्यांग, विधवा, वृद्ध यांना १ हजार रु. अतिरिक्त अर्थसाह्य, स्थलांतरीत मजुरांसाठी त्यांच्या राज्यातच सुरु केलेली ग्रामीण रोजगार योजना, मनरेगा साठीची तरतूद १ लाख कोटी करणे, कृषी पायाभूत सुविधांसाठी १ लाख कोटींचा निधी अशा पद्धतीने पंतप्रधानांनी जाहीर केलेल्या २० लाख कोटीच्या पॅकेजमधून अर्थव्यवस्था गतीमान करण्यासाठी प्रयत्न झाले आहेत. यामुळे कृषी क्षेत्रात ३ टक्के वाढ दिसली आहे, असेही श्री. ठाकूर यांनी सांगितले.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Accept !