भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना वाहिली श्रद्धांजली
माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या
निधनाने देशाने एक विद्वान नेता, कुशल प्रशासक आणि
अनुभवी मार्गदर्शक गमावला आहे, अशी श्रद्धांजली भारतीय जनता
पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी सोमवारी अर्पण केली.
चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, प्रणव मुखर्जी २०१२ ते २०१७ या कालावधीत देशाचे राष्ट्रपती होते. त्यापूर्वी केंद्रीय मंत्री म्हणून त्यांनी दीर्घकाळ काम केले. अर्थमंत्री, परराष्ट्रमंत्री, संरक्षणमंत्री, व्यापारमंत्री अशा विविध जबाबदाऱ्या त्यांनी कुशलतेने पार पाडल्या. त्यांची पाचवेळा राज्यसभेवर आणि दोनवेळा लोकसभेवर निवड झाली होती. संसदीय कार्याचा त्यांना व्यापक अनुभव होता.
देशाचे अर्थकारण, संसदीय व्यवहार
आणि परराष्ट्र संबंध याविषयी त्यांच्या अफाट ज्ञानाबद्दल सर्वच राजकीय पक्षांमध्ये
आदर होता. त्यांना विद्वत्तेची देणगी लाभली होती. त्यांचे व्यापक वाचन होते व
त्यांनी अनेक ग्रंथ लिहिले होते. त्यांच्याकडे मार्गदर्शक म्हणून पाहिले जात होते.
त्यांच्या निधनाने देशाची हानी झाली आहे. भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्रतर्फे आपण त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो.
