भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांचे आवाहन
महाराष्ट्रात भारतीय जनता
पार्टीची स्वबळावर सत्तास्थापन करण्यासाठी
कार्यकर्त्यांनी कटिबद्ध व्हावे, असे आवाहन भाजपाचे
राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी सोमवारी केले.
प्रदेश भाजप कार्यसमिती
बैठकीत बोलताना श्री.नड्डा यांनी हे आवाहन केले.
व्हर्च्युअल माध्यमातून झालेल्या या बैठकीला प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी
पक्षनेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री प्रकाश
जावडेकर, राष्ट्रीय सह संघटन मंत्री
व्ही. सतीश तसेच राज्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
श्री.नड्डा म्हणाले की, कोरोना महामारीमुळे निर्माण झालेली स्थिती
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने अत्यंत सक्षमतेने हाताळली.
लॉकडाऊनचा निर्णय वेळेत घेतल्याने मोठी जीवितहानी टळली. वैद्यकीय सुविधांच्या
दृष्टीने अत्यंत प्रगत असलेले अमेरिका व युरोपातील देशांना लॉक डाऊनचा निर्णय
वेळेत घेता न आल्याने या देशातील बळींची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली.
अडचणीत सापडलेल्या
अर्थव्यवस्थेला आधार देण्यासाठी मोदी सरकारने 20 लाख कोटींचे पॅकेज जाहीर केले. या
पॅकेजचा लाभ समाजातील अनेक वर्गांना झाला. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उद्योग, कृषी या सारख्या विविध क्षेत्रांना या
पॅकेजचे फायदे पोहचविण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे. त्याच बरोबर केंद्र
सरकारच्या कामगिरीची माहिती सामान्य माणसापर्यंत प्रभावीपणे पोहचवली पाहिजे, असेही श्री.नड्डा यांनी सांगितले.
श्री.नड्डा यांनी सांगितले की, कोरोनामुळे निर्माण झालेल्या स्थितीचा सामना करण्यात राज्यातील सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. राज्य सरकारचे हे अपयश कार्यकर्त्यांनी जनतेपुढे प्रभावीपणे मांडले पाहिजे. या पुढील काळात कार्यकर्त्यांनी सामान्य माणसाचे प्रश्न सोडवण्यासाठी सक्रिय झाले पाहिजे. भविष्यात राज्यात स्वबळावर सत्तेत आणण्याचा निर्धार करून कार्यकर्त्यांनी काम करावे, असे आवाहनही त्यांनी केले. श्री.नड्डा यांनी लॉकडाऊन काळात पक्ष कार्यकर्त्यांनी केलेल्या सेवा कार्याची प्रशंसा केली.
