थांबलो थोडा, हरलो नाही...

Manogat
0

  
राज्यातील जनतेने अतिशय भक्कम साथ, स्नेह, आशीर्वाद, प्रेम आणि पाठिंबा मला आणि भारतीय जनता पार्टीला दिला आहे. महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीचा पहिला मुख्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मला मिळाली.

भारतीय जनता पार्टीने कायम अंत्योदयाचा मार्ग स्वीकारला. गरीब कल्याणातूनच विकासाचा राजमार्ग जातो, याच तत्त्वावर गेली 5 वर्ष आपल्या सरकारने काम केले आणि त्या संकल्पाला महाराष्ट्रातील जनतेने दिलेली ही पावती आहे. भाजपा हा शहरी पक्ष आहे, असा समज राजकीय पंडितांकडून पसरविला जातो. पण, या निवडणुकीत ग्रामीण भागातूनही मिळालेले यश हे याच गरिब कल्याणाच्या मार्ग अंगीकरणाचे फळ आहे. शेतकर्‍यांना केलेली विकमी मदत असो, जलयुक्त शिवारच्या माध्यमातून गावा-गावांत केलेली जलक्रांती असो त्याचा परिणाम या निवडणुकीत स्पष्टपणे दिसून आला. केलेल्या कामाला जनता हमखास प्रतिसाद देते, हा विश्वास यातून अधोरेखित होतो. महाराष्ट्राच्या दुष्काळमुक्तीचे आपले स्वप्न पूर्ण करण्याची संधी महाराष्ट्राने दिली, यातूनच त्यांचा सार्थ विश्वास यातून दिसून येतो.

छत्रपती शिवाजी महाराजांना अपेक्षित रयतेचे कल्याण आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा समतेचा विचार हेच आपल्या प्रत्येक निर्णयाचे गेली 5 वर्ष सूत्र राहिले आणि तेच सूत्र भविष्यात सुद्धा राहील. आज माध्यमांमधून या निकालाचे विश्लेषण विविध अंगांनी होत असताना आपल्या कार्यकर्त्यांनी या जनादेशाचा अर्थ नीट समजावून घेतला पाहिजे. या जनादेशाने भाजपाच्या मतांमध्ये मोठी वाढ केली आहे. 2014 मध्ये 260 जागांवर आपल्याला 1,53,51,926 मते मिळाली होती. त्या तुलनेत 2019 मध्ये अवघ्या 164 जागांवर 1,41,17,309 मते मिळाली आहेत. जर प्रत्यक्ष लढविलेल्या जागांनुरूप मतांची टक्केवारी पाहिली, तर भाजपालाच सर्वाधिक 44.47 टक्के मते प्राप्त झाली आहेत. शिवसेनेला 38.30 टक्के, राष्ट्रवादी काँग्रेसला 38.28 टक्के तर काँग्रेसला 32.73 टक्के मते मिळाली आहेत. भाजपाच्या जागांमध्ये सुद्धा मोठी वाढ झालेली तुम्हाला दिसून येईल. 2014 मध्ये आपण 260 ठिकाणी लढलो आणि त्यापैकी 122 जागा जिंकलो.

2019 मध्ये आपण केवळ 164 जागा लढविल्या आणि त्यापैकी 105 जिंकल्या. आपला स्ट्राईक रेट आपण 47 टक्क्यांवरून 64 टक्क्यांवर नेला. एकिकडे ग्रामीण भागात आपल्या जागा वाढत असताना मुंबईत सुद्धा आपण निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले.

मुंबईतील 36 पैकी सर्वाधिक 16 जागा भाजपाला मिळाल्या. पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा 2014 ला मिळालेल्या जागांइतक्याच जागा आपण कायम ठेवल्या. या विजयात सर्वात मोठा वाटा कुणाचा असेल, तर तो आमच्या परिश्रमी कार्यकर्त्यांचा! अपार कष्ट, सतत सरकार आणि जनता यांच्यातील महत्वाचा दुवा म्हणून, त्यांनी काम केले. जणू प्रत्येक कार्यकर्ता देवेंद्रबनून ही निवडणूक लढत होता. सरकारचा प्रत्येक निर्णय जनतेपर्यंत पोहचवित होता. म्हणूनच हा विजय त्या प्रत्येक कार्यकर्त्याला मी समर्पित करतो. केंद्रात मा. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांचे नेतृत्त्व, आमचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. अमितभाई शाह यांचे मार्गदर्शन आणि कार्यकारी अध्यक्ष श्री जे. पी. नड्डाजी आणि इतरही सर्व नेत्यांनी सातत्याने या निवडणुकीत सकिय सहभाग घेतला. या सर्व सामूहिक प्रयत्नांमुळेच आपण सारे मिळून हे यश गाठण्यात यशस्वी झालो. त्यामुळे या सर्व नेत्यांचे आभार मानावे, तितके कमी आहेत. पुढची 5 वर्ष विरोधी पक्षात राहून आणखी कठोर परिश्रम करण्याची जबाबदारी आपल्यावर आली आहे. माझी जबाबदारी जशी वाढली, तशी आपल्या सर्व कार्यकर्त्यांची सुद्धा जबाबदारी तितकीच वाढली आहे.

सरकार आणि जनता यांच्यातील संवादसेतू म्हणून गेली 5 वर्ष आपण अतिशय उत्तमपणे काम केले. आता याही पुढच्या काळात त्याच गतीने, किंबहूना अधिक जबाबदारीने हे काम आपल्याला करायचे आहे. आपल्या सर्वांच्या साथीने गेली 5 वर्ष आपण आघाडी सरकारच्या 15 वर्षांच्या कालखंडापेक्षा अधिक काम केले. आता ही 5 वर्ष आणखी परिश्रमाची आहेत. विरोधी पक्षात राहून आपल्याला सत्ताधारी आघाडीवर अंकुश ठेवायचा आहेच त्याचबरोबर आपला जनाधार वाढवायचा आहे.

आपण सारे मिळून भक्कमपणे, समर्थपणे ही जबाबदारी उचलू या. आपल्या महाराष्ट्राला आणि अर्थातच राष्ट्राला परमवैभवापर्यंत नेऊ या. या प्रवासात आपल्या सर्वांची साथ माझ्यासाठी मोलाची असेल.

-   देवेंद्र फडणवीस




Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Accept !